भगवान श्रीकृष्ण हे कुलदैवत असलेली, 'सोमवंशीय क्षत्रिय यादव कुल' या पवित्र आणि कीर्तिमान अशा कुलातून उत्पत्ती असलेली ही जमात मथुरेपासून महाराष्ट्रात आली. भगवान श्रीकृष्ण यदुवंशीय कुलातील होते. त्यामुळे हिंदू- गवळींमध्ये 'यादव गवळी' या उपजमातीला प्रथम स्थान दिले जाते. ही जमात अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर येथील संस्कृतीशी समरस झाली आहे. महाराष्ट्रात कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जमात प्रामुख्याने डोंगराळ भागात आढळते. काही प्रमाणात ठाणे आणि कोल्हापूर भागात ही जमात आढळते.
कोकणचा प्रदेश हा शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ. स. १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज यादव कोकणात आला. चेऊल परिसरात त्याने वसाहत केली होती. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदर त्या वेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वीदेखील कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या काळात यादव गवळींनीही सहभाग घेतला होता. आजही रायगडाच्या आजूबाजूला यादव गवळींची अनेक गावे आहेत.
रानावनात भटकंती करत आता डोंगराळातील गावांमध्ये ही जमात स्थायिक झाली आहे; मात्र या जमातीची पोटापाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबलेली नाही. स्वतःच्या चालीरीती, रुढी आणि परंपरेचा ठेवा जपत वर्षानुवर्षे ही जमात महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक घटक बनली आहे.
वास्तव्य
महाराष्ट्रात यादव गवळी प्रामुख्याने मुंबई, रत्नागिरी, सिंदुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, अकोला, वाशीम, यवतमाळ, पुणे, ठाणे, सांगली, वर्धा, गडचिरोली, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर शहरात प्रामुख्याने वसलेले आहेत. हि पोट-जात प्रामुख्याने जनावरे खरेदी-विक्री व्यवसाय करतात.
यादव गवळी महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि कर्नाटकच्या काही भागात वसलेले आहेत. या भागातील यादव गवळी पोट-जातीतील लोक राजकारणात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.